सावळाराम लक्ष्मण हळदणकर
काही सहकार्यांच्या मदतीने ‘आर्ट सोसायटी ऑफ इंडिया’ ही संस्था स्थापली. सावळाराम हळदणकर यांनी ‘हळदणकर फाईन आर्ट इन्स्टिट्यूट’ या संस्थेचीही स्थापना केली होती. प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम (मुंबई), नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट (नवी दिल्ली), जगमोहन पॅलेस (म्हैसूर), नागपूर म्युझियम (नागपूर) आणि मॉस्को अकादमी ऑफ आर्ट (रशिया) याठिकाणी त्यांची चित्रे आहेत.
(२५ नोव्हेंबर १८८२–३० मे १९६८). महाराष्ट्रातील प्रख्यात चित्रकार. सावंतवाडी येथे जन्म. सावंतवाडी येथील विद्यार्थिदशेतच त्यांनी चित्रकलेतील ग्रेड (श्रेणी) परीक्षेतही विशेष नैपुण्य संपादन केले. चित्रकलेच्या पुढील शिक्षणासाठी १९०३ मध्ये ते मुंबईला गेले आणि त्यांनी तेथील सर जे. जे. स्कूल ऑफआर्ट मध्ये कलाशिक्षणासाठी रीतसर प्रवेश घेतला. तेथे त्यांना अनेक मातब्बर ज्येष्ठ कला-शिक्षकांचे व चित्रकारांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. विद्यार्थि-दशेपासूनच त्यांना चित्रकलेचीअनेक पारितोषिके मिळत गेलीआणि १९०७ पासून चित्रकार म्हणून त्यांचा नावलौकिक झाला. मुंबई, मद्रास (चेन्नई), कलकत्ता (कोलकाता), सिमला, अमृतसर, म्हैसूर येथील प्रदर्शने, तसेच दिल्ली येथील ऑल इंडिया फाइन आर्ट्स अँड क्राफ्ट सोसायटीची प्रदर्शने अशा सर्व ठिकाणी त्यांची चित्रे झळकू लागली व अनेक चित्रांना मानाची पारितोषिकेही मिळाली. त्यांनी १९०६ पासून १९५८ पर्यंत मुंबईतील बाँबे आर्ट सोसायटी व आर्ट सोसायटी ऑफ इंडिया यांच्या प्रदर्शनांत सातत्याने चित्रे पाठवली. त्यांनी नवोदित चित्रकारांना प्रशिक्षण देण्यासाठी १९०८ मध्ये दादर येथे चित्रकला वर्ग सुरू केला. पुढे त्याचाच विस्तार होऊन १९४० मध्ये गिरगाव येथे ‘हळदणकर फाइन आर्ट इन्स्टिट्यूट’ ही संस्था स्थापन झाली. नव्या पिढीतील चित्रकारांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच प्रदर्शनादी विविध उपक्रम राब-विण्यासाठी त्यांनी काही स्नेह्यांच्या सहकार्याने ‘आर्ट सोसायटी ऑफ इंडिया’ ही संस्था १९१८ मध्ये स्थापन केली. आजही ही संस्था उत्तमकार्य करीत आहे. १९२५ मध्ये त्यांना त्यांच्या मॉहमेडन पिलग्रिम या कॅन्व्हासवरील तैलरंगातील फकिराच्या चित्राला बाँबे आर्ट सोसायटीचे सुवर्णपदक मिळाले. त्यांच्या निर्मितीत प्रामुख्याने व्यक्तिचित्रे, निसर्गचित्रे व पौराणिक विषयांवरील प्रसंगचित्रे यांचा समावेश होतो.
जलरंग व तैलरंगया दोन्ही माध्यमांवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यांतील तंत्रविशिष्ट बारकावे त्यांनी विलक्षण कौशल्याने आपल्या चित्रांतून दर्शविले; पण त्यांनी शुद्ध पारदर्शक जलरंगांत रंगविलेली चित्रे त्यांतील अप्रतिम तंत्रकौशल्यासाठी देश-विदेशात वाखाणली गेली. चित्रांत साधलेले छायाप्रकाशाचे परिणाम, चित्रणासाठी वापरलेल्या कमी-अधिक जाडीच्या रंगछटा व रंगलेपनाचे कौशल्य ही त्यांची शैलीवैशिष्ट्ये जलरंग व तैलरंग या दोन्ही माध्यमांत जाणवतात.
त्यांनी रंगवलेल्या पं. मदनमोहन मालवीय यांच्या व्यक्तिचित्राचा राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्याकडून खास गौरव करण्यात आला (१९६४). दिल्ली येथील ललित कला अकादमीतर्फे १९६२ मध्ये त्यांना अधिछात्रवृत्ती देऊन गौरविण्यात आले. उत्कृष्ट कलाशिक्षक व शास्त्रीय संगीताचे दर्दी जाणकार म्हणूनही हळदणकरांची ख्याती होती. त्यांच्या श्रेष्ठ दर्जाच्या चित्रांनी भारतीय कलेतिहासातील एका महत्त्वाच्या टप्प्याचे प्रतिनिधित्व केले.
त्यांचे सुपुत्र गजानन सावळाराम हळदणकर (१९१२–८१) हेही श्रेष्ठ दर्जाचे चित्रकार म्हणून ख्यातकीर्त होते. त्यांनी वडिलांकडेच चित्र-कलेचे धडे घेतले आणि वडिलांचा कलावारसा पुढे प्रगतिपथावर नेला.’ बाँबे स्कूल ङ्खची (मुंबई चित्रसंप्रदाय) यथार्थदर्शी वास्तववादी चित्रण-परंपरा १९३६ नंतरच्या काळात पुढे नेणाऱ्या प्रयोगशील चित्रकारांत त्यांचे स्थान महत्त्वाचे आहे. जलरंग व तैलरंग माध्यमांची आणि रेखाटन व रंगलेपन तंत्रांत ते साहसी प्रयोगशील वृत्तीने आणि जोमदारपणे कामकरीत असत; मात्र प्रयोगशीलतेतही या माध्यमांचे तंत्रवैशिष्ट्ये व तरलता त्यांनी कसोशीने जोपासली.
अ लेडी सिटिंग ऑन अ चेअर (जलरंग), बॅरिस्टर व्ही. व्ही. ओक (कॅन्व्हासवर तैलरंग), बनूताई (रंगशलाका) ही त्यांनी रंगवलेली काही प्रसिद्ध व्यक्तिचित्रे. त्यांतील व्यक्तिमत्त्वसूचक वास्तवदर्शिता लक्षणीय आहे. त्यांनी रंगविलेल्या निसर्गचित्रांत क्षणोक्षणी बदलणाऱ्या निसर्गाची सूक्ष्म स्पंदने विविध रंगरूपांत टिपण्याचा स्तुत्यप्रयत्न दिसतो. त्यांनी काही ऐतिहासिक व सामाजिक विषयांवर प्रसंगचित्रे रंगवली आहेत.
मुंबई येथे त्यांचे निधन झाले.
👍✨
Thank you so much 🙏